फेरीवाले विरुद्ध मनसे वादात सुरुवातीला मार खाणारे फेरीवाले आता आक्रमक होऊ लागले असून मालाडपाठोपाठ काल विक्रोळीतही फेरीवाल्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यात मनसेचे पाच पदाधिकारी गंभीर जखमी झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी ‘यापुढे मार खाल्ला तर पदावरून काढून टाकीन’ असा सज्जड दम पदाधिकाऱ्यांना सोमवारी दिला.एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात एल्गार पुकारला. या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रेल्वे व पोलिसांना पंधरा दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर सोळाव्या दिवशी ठाण्यासह मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून पिटाळून लावले होते.काल विक्रोळी टागोरनगर येथे मनसेचे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम व काही कार्यकर्ते फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतानाच अब्दुल अन्सारी व अन्य काही जणांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारले. या मारहाणीची माहिती मिळताच मनसेचे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे व उपविभाग अध्यक्ष उपेंद्र शेवाळे व कार्यकर्ते हे रात्री अब्दुल अन्सारी याला मारण्यासाठी गेले असताना अब्दुल व त्याच्या सहकाऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या पाच कार्यकर्त्यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews